पदरगड

भीमाशंकरजवळचा पदरगड म्हणजे "कलावंतिणीचा महाल'. पदरगड एका दिवसात खरं तर शक्‍य नाही; पण जबर इच्छाशक्ती आणि अफाट स्टॅमिना असेल तरच एका दिवसाचा बेत करावा. भल्या पहाटे 4 वाजता भल्या पहाटे राक्षसी वेळेत निघावे लागते. या वेळी हमखास खायला मिळणारे ठिकाण म्हणजे युनिव्हर्सिटी सर्कल. तिथे वाफाळणारे उप्पीट, इडली आणि वर गरम चहा... वा... याला म्हणतात दिवसाची चांगली सुरुवात!

एकदा पोट शांत केले की मग डोके आणि गाडी पळायला लागते! गाडी नाशिक हायवेवर फेकली की झकास गप्पांचे फड रंगतात. आधीचे ट्रेक्‍स, पुढचे बेत, मग केलेल्या ट्रेक्‍सचे भन्नाट अनुभव, मध्येच कुणाची तरी खिल्ली उडवणे, असे करत मंचरवरून डावीकडे वळून भीमाशंकराच्या रस्त्याला लागायचे. रस्ता लहान झाला तरी विशेष गर्दी नसतेच. दुतर्फा बहारदार हिरवाई आणि फुलणाऱ्या फुलांची रेलचेल. सकाळची प्रसन्न हवा आणि अवतीभोवती सह्याद्रीच्या डोंगररांगा. लईच भारी मूड जमून जातो. साधारण आठ-साडेआठला आपण भीमाशंकरला पोचतो. दर्शन आणि मिसळपाव खाऊन सव्वानऊला भीमाशंकरची "रेंज' उतरायला चालू करायची. पदरगडाला जाण्यासाठी भीमाशंकरची रांग उतरून खाली पदराच्या वाडीत जावे लागते. गणेश घाट, शिडी घाटमार्गे भीमाशंकरला खालून खांडसहून चढून येणारे "ट्रेकर्स' याच गावातून वर येतात. वरून ती वाडी आणि तिथली घरे मुंगीएवढी दिसत असतात. अर्धा पर्वत उतरून गेल्यावर एक वळसा घालून आपण एका मोकळ्या दरीच्या समोर येतो. तिथूनच पुढे आडवा "ट्रॅव्हर्स' मारून एका पाणवठ्याशी पोचतो आणि मग पदरगड काय चीज आहे ते समोर येते. अगदी मळलेली पायवाट आहे. त्यामुळे इथे चुकण्याची शक्‍यता शून्य. तीच वाट पुढे खाली गावाशी उतरते. एक-दोन झोपड्या उभारलेल्या आहेत, जिथे चहा, ताक अशी "बेश्‍ट' सोय होते. पुढे त्या वाडीला उजवीकडे ठेवून, नागफणी पॉइंटच्या बरोबर खालून जंगलातून वाट काढत दोनेक किलोमीटर चालले की पदरगड सामोरा येतो. त्याला प्रदक्षिणा घालून त्याच्या मागच्या बाजूने जंगलातून वाट काढतच त्याला बिलगावे लागते. अर्थातच माहीतगार वाटाड्या अत्यावश्‍यक आहे.

चालता चालता वाटेने झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन आपण एका पठारावर येतो. तिथून समोर अर्धा डझन धबधबे आणि शिडी घाटाचे दर्शन होते. काही खांडसहून येणारे वीर घाट चढत असतात. त्यांच्या "हर हर महादेव'मध्ये सूर मिसळून डावीकडे पदरगड सामोरा येतो. दूरवरूनही त्याची गुहा स्पष्ट दिसते. दृश्‍य एकदम स्फूर्तिदायी, आव्हान देणारे. मग पाय जरा उचलायचे. आता खांडसहून येणारी वाट सोडून पुन्हा डावीकडे वळण. पदरगडाला खालूनच अर्धी प्रदक्षिणा होते. अजून थोडे अंतर चालून निबिड जंगलात शिरायचे. गच्च झाडीतून वाट काढत वाटाड्याच्या मागे निमूट चाल करायची. सपाट जमीन संपून खडी चढण लागते. निसरडी चढण आणि दाट गवत यांनी काम आणखी अवघड होते. अर्ध्या तासात एका लहान कातळाला वळसा घालून आपण एका अरुंद खिंडीत येऊन पोचतो. एका वेळी एका व्यक्तीला कसेबसे उभे राहता येईल, एवढीच जागा. लहानसे भुयार दुसऱ्या बाजूने वर आलेले आहे. ती दुसऱ्या बाजूने येणारी अतिशय अवघड वाट. इथून पुढे आता फार काळजीपूर्वक चढाई करावी. समोर 70-80 अंशांची 20 फूट उंच खडी कातळभिंत. एकही चूक करायला "चान्स' नाही. ठिसूळ झालेल्या खडकामुळे काही "होल्ड्‌स' धोकादायक बनले आहेत. त्याचा अंदाज घेत तो "रॉक पॅच' पार करायचा आणि एका "रिज'ला लहानसा "ट्रॅव्हर्स' मारून वर निघायचे. वर काही अंतर चलून गेल्यावर पुन्हा कडा उजव्या हाताला घालून, चालत राहिले की पुन्हा एक अती अरुंद बेचके; पण हे जरा जास्त अवघड. शेवाळलेले खडक, पाय ठेवायला "होल्ड' नाही आणि हात धरून "ग्रिप' घ्यायला निसटणारे दगड. त्यातल्या त्यात आधार म्हणून एक पक्के झाड उगवलेले. त्याच झाडावरून जाऊन मग कोरड्या खडकावरून बेचक्‍याच्या वर निघायचे. पुढे तर सरळ सरळ खोदीव पायऱ्या आहेत आणि त्यानंतर खूप माजलेले गवत. अगदी डोक्‍याएवढे उंच. समोरच एक पाण्याचे टाके आहे. माथ्यावर एक उघड्यावर मंदीर आहे भैरवनाथाचे. दर्शन घेऊन पुढे

झालो की, एरवी उजाड असलेला माळ छातीएवढ्या गवताने लागलेला माळ पार करून गुहेत पोचायचे. वाटेत दोन पाण्याची टाकी आहेत. त्यांच्या काठावरून पुढे जायचे; पण एका बाजूला टाके आणि एका बाजूला चारशे-पाचशे फूट दरी. फार सावधानतेने जावे लागते. शेवटी एकदाची ती गुहा समोर दिसते; पण दुर्दम्य आत्मविश्वास, "टीमवर्क' आणि सह्याद्रीची ओढ इथपर्यंत घेऊन येते. त्याशिवाय हा "ट्रेक' केवळ अशक्‍य.

परतीचा भीमाशंकरपर्यंतचा प्रवास असाच जीव मेटाकुटीला आणणारा. सूर्यनारायण आपला दिवसाचा प्रवास संपवीत नभांगण रंगीत करून निघालेले असतात. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंगा-खांद्यावर ढगाचे पुंजके नाचवत असतो. पाठीमागे पदरगड त्या संधिप्रकाशात न्हाऊन निरोप देतो, "गड्या, परत ये एकदा निवांत!!'

उपयुक्त माहिती:

रस्ते:
- पुणे-नाशिक रोड-चाकण-मंचर-भीमाशंकर-ट्रेक करून मुंगी घाट-पदराची वाडी.
- मुंबई-लोणावळा-चाकण-मंचर-भीमाशंकर.
- मुंबई-कल्याण-खांडस-ट्रेक करुन पदराची वाडी.
- मुक्कामाची सोय: भीमाशंकरमध्ये होऊ शकते.
- जेवणाची सोय: भीमाशंकर, पदराची वाडी, खांडस.

आसपासचा परिसर:

- भीमाशंकर (गणेश घाट, शिडी घाट ट्रेक्‍स) खांडस
पदरगडावरून आसपासच्या पेठ-पेबचे किल्ले.

टीप: शक्‍यतो दोन दिवसांचा "ट्रेक'चा बेत आखावा. एका दिवसात बारा ते चौदा तास "ट्रेक' करणे जवळजवळ अशक्‍य.
-पंकज झरेकर
तुमची प्रतिक्रिया लिहा ...

blog comments powered by Disqus