![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
निसर्गाच्या शब्दशः कुशीतले अंबोली
![]() पावसाने जुलै-ऑगस्टमध्ये एकदा का वरचा "सा' लावला, की "श्या, का फिरायचे? किती पाऊस पडतोय. त्यापेक्षा घरी चहा-भजी करा,' असे म्हणणारेदेखील पायाला भिंगरी बांधून भिरभिरू लागतात. यंदाचा एकतरी पाऊस अनुभवावा, म्हणून लोणावळा, पाचगणी अशा ठिकाणांच्या जत्रेत सामील होतात; पण स्वप्नी दिसलेला पाऊस इथे कुठेच भेटत नाही. त्यासाठी जरा ऑफबीट लोकेशनच पाहिजे. अंबोलीसारखे. अंहं, हे अंबोली म्हणजे ते कोल्हापूर-सावंतवाडी घाटातले नाही. हे आहे पुण्यापासून अगदी दोन-अडीच तासांच्या अंतरावर. जुन्नरजवळ. पुण्याहून नाशिक महामार्ग पकडून राजगुरुनगरला पोचले, की न्याहारीची वेळ झालेली असतेच.
तिथे भरपेट नाश्ता करून नारायणगावातून डावी घेऊन जुन्नरचा रस्ता धरावा. थोडे अंतर
गेले, की उजवीकडे जीएमआरटीचे रिसिव्हर अँटेना आणि डाव्या हाताला डोंगरात कोरलेल्या
प्राचीन गुहा लक्ष वेधून घेतात. जसे जुन्नर दृष्टिपथात येते, तसा त्याला सावलीसारखा
सोबत करणारा, युगपुरुष शिवाजी महाराजांच्या जन्माचा साक्षीदार असलेल्या शिवनेरीच्या
दर्शनाने सह्याद्रीच्या विराट रूपाची झलक मिळते. किल्ला पाहायचा झाल्यास अर्ध्या उंचीपर्यंत
गाडी पोचते आणि तिथून पुढे दीड-दोन तासांत किल्ला पाहून पूर्ण होतो. शिवनेरीला डावीकडे
ठेवून सरळ पुढे रस्त्याने पुढे निघालो, की उजवीकडे माळशेज घाटरांगा श्रावणी उन्हात
चकाकत असतात. आपटाळे गावातून मुख्य रस्ता सोडून गाड्या थोड्या खराब रस्त्याला लागतात.
आपटाळे-कोलदरे-उच्छिल असे टप्पे गाठत अंबोलीला पोचलो. उच्छिल गावातल्या 1940 च्या दशकातील
तत्कालीन "रॉबिनहूड' कोंडाजी नवले यांची कहाणी रोमहर्षक आहे. श्रीमंत जमीनदारांची संपत्ती
लुटून ती गोरगरिबांमध्ये वाटणाऱ्या या रॉबिनहूडला जेरबंद करण्यासाठी ब्रिटिश सरकारने
इनामही ठेवले होते. अनेकदा पोलिसांना तुरी देऊन गोरगरिबांचा वाली ठरलेले कोंडाजी नवले
शेवटी फितुरीमुळे जेरबंद झाले. आजही या गावात त्यांचे घर आहे.उच्छिलवरून अंबोलीकडे जातानाच आपण स्वर्गात आलो आहोत, याचा प्रत्यय येऊ लागतो. डाव्या बाजूला भातशेती आणि एक मोठा तलाव. उजवीकडे हळूहळू वाढत जाणारी डोंगररांगांची उंची. आणखी एखादा किलोमीटर पुढे गेलात, की दोन्ही बाजूंना महाकाय पर्वत आणि समोर तशीच डोंगररांग. त्यापुढे डोंगराच्या कुशीतला एक गाव. डावीकडे सह्याद्रीचा एक बेलाग कडा अंगावर येत असतो, उजवीकडे एक वशिंड आणि एक सुळका थेट आकाशात घुसतात. समोरच दाऱ्या घाटाची खिंड कोकणातून येणाऱ्या ढगांना वाट करून देते. डझनभर मोठे आणि अनेक लहान जलप्रपात सह्याद्रीचे पाय धुण्यासाठी झेप घेत असतात. त्यांच्या अवखळ प्रवाहाच्या नंतर संथ चंदेरी पायघड्या झालेल्या दिसतात. हिरव्याकंच भातखाचरांमध्ये लावणीची आणि लावणीनंतरच्या कामांची लगबग चाललेली असते. तिन्ही बाजूंनी पर्वत रांगा आणि अर्ध्यापर्यंत आलेले कुंद श्रावणी ढग चित्त उल्हसित करून जातात. लहानमोठ्या डबक्यांचे हिरव्यागार धरणीच्या कोंदणात बसवलेले हिरे जगरहाटीचा विसर पाडतात. पुढे अचानकच रस्ता संपतो. म्हणजे घाटावरून येणाऱ्या रस्त्याचे हे शेवटचे टोक. यापुढे आहे तो सह्याद्री, आपला सह्याद्री. वर चढून गेलात आणि त्यापलीकडे पाहिलेत, की दिसतो सर्वांगसुंदर कोकण. गाडी बाजूला ठेवून पायवाट आपलीशी करायची आणि चालत राहायचे. एका वस्तीजवळ पायवाटही अरुंद होते. तिथल्या घरांच्या बाजूने डावीकडे पुढे गेलो, की आपण एका ओहळाच्या काठाशी येऊन पोचतो. अवखळ, उथळ पाणी खडकावरून दंगामस्ती करत आपल्यालाही त्या मूडमध्ये घेऊन जाते. लहानसे धबधबे, खेळकर पाणी, कमरेइतके खोल डोह आपली डुंबण्याची हौस पूर्ण करून टाकतात. या वातावरणात आपली कायम सोबत करत असतात श्रावणा-गणपतीतला ऊन-पावसाचा खेळ आणि अचानक येणाऱ्या सरी. अशा ऑफबीट वर्षासहलीचा जास्त आनंद खचितच खूप वेळ आपली सोबत करेल. कदाचित नेहमीच्या लोणावळा, पाचगणीहूनही अधिकच. त्याच आठवणी बरोबर घेऊन परतीची वाट धरायची, पुढल्या भटकंतीचे बेत आखत. उपयुक्त माहिती : जाण्याचे मार्ग : 1. पुणे-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-कोलदरे-उच्छिल-अंबोली. 2. मुंबई-कल्याण-वैशाखरे-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-कोलदरे-उच्छिल-अंबोली 3. नाशिक-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-कोलदरे-उच्छिल-अंबोली. आसपासचा परिसर : 1. शिवनेरी (जुन्नर) 2. जीवधन 3. दाऱ्या घाट 4. दुर्ग-ढाकोबा जुळे किल्ले. 5. चावंड किल्ला. 6. हडसर किल्ला 7. नाणेघाट टिप्स : 1. मुक्कामाची सोय जुन्नरमध्ये. 2. ट्रेक हवा असेल तर अंबोलीच्या वरच दुर्ग आणि ढाकोबा हे जुळे किल्ले आहेत. - पंकज झरेकर http://www.pankajz.com/ http://www.flickr.com/photos/pankajz/ |
||
|
तुमची प्रतिक्रिया लिहा ... blog comments powered by Disqus |
||