![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
जरा वेगळे दिवेआगर
![]() पुण्या-मुंबईत राहून दिवेआगर माहीत नाही असा माणूस विरळाच. अगदी हेच काय; पण सगळ्या महाराष्ट्राला दिवेआगर म्हणजे एक रमणीय समुद्रकिनारा हे समीकरण ठाऊक आहे. समुद्रकिनारा म्हणजे फक्त समुद्रात भिजणे यापेक्षाही वेगळा आनंद दिवेआगर देऊन जाते. त्यासाठी दोन दिवस काढून तिथे जरा निवांत फेरफटका मारायला हवा. पुण्या-मुंबईहून दिवेआगरला जाण्यासाठी बसची सोय आहे. अधिक माहितीसाठी एसटीच्या वेबसाइटचाही उपयोग होईल. साधारण सकाळी घरातून निघाले, की दुपारच्या जेवणाला आपण दिवेआगरात हजर होतो. दिवेआगर आणि संपूर्ण कोकणपट्टी म्हणजे ओला नारळ आणि ताजी मासळी यांचे समीकरण. प्रत्येक भोजनात ओल्या नारळाचा, कोकमाचा यथेच्छ वापर. साहजिकच चार घास जास्तच पोटात जातात. मुक्कामाची सोय आधीच केलेली हवी. म्हणजे तृप्त झालेल्या पोटावर हात फिरवत दुपारची निवांत वामकुक्षी काढता येईल. साधारण साडेचार-पाचला उठून सुवर्णगणेशाचे दर्शन घेतले, की मन कसे अगदी प्रसन्न होते! नित्य झळाळी असलेला गजाननाचा सुवर्णाचा मुखवटा डोळ्यांचे पारणे फेडतो. देवदर्शन झाले की समुद्र जवळ करावा; पण थांबा! तो गर्दी असलेला किनारा तुम्हाला मुंबई-अलिबागलाही पाहायला मिळेल. आपण इथे आलोय ते शांत-निवांत बसून खाऱ्या कोकणाची गंमत पाहायला. त्यांचे लोकजीवन जवळून अनुभवायला. दिवेआगराला उजव्या हाताला ठेवून एक रस्ता अरुंद पुलावरून श्रीवर्धनकडे जातो. त्या रस्त्याने एक लहानसा घाट चढताना आपल्याला दिवेआगर बीचवर उसळलेली गर्दी दिसेल. तिला दुरूनच टाटा करून घाट संपला, की आपण एका टेकडीच्या माथ्यावर पोचतो. खाली अथांग सागर आणि टेकडीच्या माथ्यावरून जाणारी नागमोडी डांबरी सडक. याला म्हणतात खरा आणि खारा कोकण! थोडे पुढे उजवीकडे एक मच्छीमारी बंदर दिसेल. या गावाचे नाव भरडखोल. रस्ता सोडून खाली उतरून गेले, की सगळ्या कोळ्यांशी दोस्ती होईल. राकट चेहरा, रापलेले खांदे तरीही मनातून भरली शहाळी. त्यांच्या मासेमारीची जाळी ओढताना, मासे भरताना, पडाव-होड्या-ट्रॉलर आतबाहेर करताना पाहण्यात वेळ कसा निघून जातो पत्ताच लागत नाही. गावातून पुढे गेलो, की उजवीकडे अतिशय बुटक्या अशा दोन टेकड्यांच्या मधून पांढरी स्वच्छ रुपेरी वाळू, माडांची जाळी दिसते. तिथे गाडी बाजूला लावून समुद्राकडे निघाले, की समोर चंद्रकोरीच्या आकारातला विस्तीर्ण सागरकिनारा समोर येतो. पायांना हळूच गुदगुल्या करणारी मऊशार वाळू, समुद्रावरून येणारा अवखळ खारवट वारा, माडांची सळसळ आणि समोर आकाशात पसरलेले मावळतीचे रंग. हाच असतो खराखुरा, स्वप्नात पाहिलेला ऑथेंटिक कोकण. त्या वाळूवर निवांतपणे गप्पा मारत बसावे, सागराची गाज कानात साठवावी आणि अंधार पडता दिवेआगर गावात परतावे. रात्री पुन्हा एकदा कोकणी जेवण आणि सोलकढीवर ताव मारून अंगणात टांगलेल्या चौपाळ्यावर गप्पा मारत, नारळीपोफळीच्या वाडीतल्या रातकिड्यांच्या गूढ आवाजात हरवून जावे. सकाळी अगदी लवकर उठून दिवेआगरच्या बीचकडे धाव घ्यावी. केतकीच्या बनातून जाणारी लाल मातीची पायवाट आपल्याला सागराकडे ओढत घेऊन जाते. या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी आतपर्यंत समुद्र उथळ आहे. ओहोटीच्या वेळी तर अगदी दोन-तीनशे मीटरपर्यंत आपण गुडघाभर पाण्यातून चालत जाऊ शकतो. त्या शांत वातावरणात चालत असताना कुठेतरी आपलाच आपल्याला नव्याने शोध लागतो. काहीतरी नवे गवसल्याचा आनंद मनात घर करून राहतो. जसे जसे ऊन चढते तसे परत फिरायचे आणि येता येता नव्यानेच बांधलेल्या रूपनारायण मंदिरात दर्शन घेऊन परतीची वाट धरायची. कसे जाल? 1. पुणे-मुळशी-ताम्हिणी-माणगाव-बोर्ली पंचायतन-दिवेआगर. 2. मुंबई-पनवेल-माणगाव-बोर्ली पंचायतन-दिवेआगर. मुक्काम जेवणाची सोय : दिवेआगर गावात होऊ शकते. सर्व सुखसोयींनी उपयुक्त अशा एमटीडीसी रिसॉर्टपासून घरगुती निवास व्यवस्था उपलब्ध. आसपासचा परिसर: 1. श्रीवर्धन (पेशव्यांचे मूळ गाव) 2. हरिहरेश्वर (दक्षिण काशी) 3. दिवेआगरवरून जवळच दिघी बंदर आहे. तिथून मुरूड-जंजिऱ्याला जाण्यासाठी लॉंच उपलब्ध. - पंकज झरेकर http://www.pankajz.com http://www.flickr.com/photos/pankajz/ |
||
|
तुमची प्रतिक्रिया लिहा ... blog comments powered by Disqus |
||