![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
"मेरा जीवन कोरा कागज.....
हिंदी चित्रपट संगीताला वेगळे वळण देणारे दशक म्हणून 1970 चे दशक ओळखले जाते. गाण्यातला गोडवा, हळुवारपणा, अर्थवाही शब्दप्रधानता यांनी सजलेल्या चाली हे 50 व 60 च्या दशकातील गाण्यांचे मुख्य वैशिष्ट्य होते. "मेलडी' आणि "ऱ्हिदम' या दोन्ही एकमेकांच्या हातात हात गुंफून चालत होत्या. सी. रामचंद्रांनी "गोरे गोरे ओ बॉंके छोरे', "भोली सूरत दिल के खोटे', "शोला जो भडके', "मि. जॉन बाबाजान', "इना मिना डिका' यासारख्या भन्नाट रचनांनी पाश्चात्य ढंगाच्या "रिदमॅटिक' गाण्यांची ठिणगी पाडली आणि "आरपार' च्या बंपर यशाने ओ. पी. नय्यरने "पंजाबी बाज' आणि "ढोलक' या वाद्याला महत्त्व देत गाण्यामध्ये "ठेक्या'चे महत्त्व अधोरेखित करायला सुरवात केली. 60 च्या दशकामध्ये "याऽऽ हूऽऽ' अशी आरोळी देत रांगड्या, धसमुसळ्या शम्मी कपूरने रूपेरी पडद्यावर धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि शंकर-जयकिशनने आपले संगीत इमेजनुसार आक्रमक केले. "ऍन इव्हिनिंग इन पॅरिस'च्या बुलंद गाण्यांनी त्यांनी आपला भव्य "हंड्रेड पीस' ऑर्केस्ट्रॉ मुख्य गायकाच्या बरोबरीने आणला आणि मग आला 1966चा शम्मीचाच "तिसरी मंझील'! संगीतकार राहुलदेव बर्मनने त्याच्या पुढच्या वादळाची झलक या सिनेमाच्या संगीतात दाखवली. 70 चे दशक सुरू झाले तेच मुळी "किशोर'युगाने! आणि 72च्या "हरे राम हरे कृष्ण'च्या नशील्या, झिंग आणणाऱ्या आशा भोसले यांच्या "दम मारो दम'च्या अभूतपूर्व यशाने हिंदी चित्रपट संगीताचा "ट्रेंड'च बदलून टाकला. इकडे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीनेही शंकर-जयकिशनची परंपरा पुढे चालवत त्यांच्या "ढोलक' स्टाईलला आणखीन "ब्राईट' स्वरूपात पेश करीत ठेक्याची परंपरा पुढे चालवायला सुरवात केली. राहुलदेव बर्मन यांच्या "हम किसीसे कम नहीं', "यादों की बारात'सारख्या सिनेमांनी पाश्चात्य संगीताला हिंदी चित्रपट संगीतामध्ये आणि पर्यायाने त्यावेळच्या तरुणाईमध्ये लोकप्रिय केले. 70 च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतात राहुलदेव बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बरोबरीने आणखी एका संगीतकाराचे नाव आपल्याला घ्यावे लागेल...अणि ते म्हणजे "कल्याणजी-आनंदजी' या संगीतकार जोडीचे! "शंकर-जयकिशन स्कूल'चे पहिले विद्यार्थी म्हणजे ही जोडी आणि दुसरे विद्यार्थी लक्ष्मीकांत-प्यारेलाल! शंकर-जयकिशनची मेलडी कल्याणजी-आनंदजींनी आणि "रिदम' लक्ष्माकांत-प्यारेलाल यांनी उचलला. 1970 च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतावर राहुलदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेला आणि कल्याणजी-आनंददी यांचेच राज्य होते, असे म्हणायला हरकत नाही. जुन्यापैकी सचिनदेव बर्मन, सलील चौधरी आणि मदनमोहन असे मोजकेच संगीतकार या बदलामध्ये टिकून होते; परंतु या दशकाच्या मध्यावर सचिनदेव बर्मन आणि मदनमोहन यांनी जगाचा निरोप घेतला. या तिन्ही संगीतकारांचे हिट चित्रपट एका पाठोपाठ एक असे येत होते. "राजेश-किशोर'च्या युगामध्ये तिघांनीही आपले सर्वोत्कृष्ट संगीत या चित्रपटांना दिले. लक्ष्मीकांत-प्यारेलालप्रमाणेच रफी-किशोर-मुकेश या तिन्ही गायकांना घेऊन सुंदर गाणी निर्माण करणारे संगीतकार म्हणून मी कल्याणजी-आनंदजी या जोडीचे नाव घेईन व त्यांना थोडे जास्त सरस मानेन. कारण वेळेनुसार, प्रवाहानुसार बदलतानाही त्यांनी त्यांची "मेलडी' कधीही सोडली नाही. शंकर-जयकिशननंतर मुकेशच्या आवाजाचा सातत्याने सर्वोत्कृष्ट वापर याच जोडीने केला आणि किशोरयुगातही त्यांनी आवर्जून रफीच्या आवाजाचाही वापर अनेक गाण्यांमध्ये यशस्वीरीत्या केला. किशोरच्या बाबतीत बोलायचे झाले तर अर्थातच "आरडी-किशोर' हे कॉम्बिनेशन टॉपवर आहेच; पण कल्याणजी-आनंदजींनी किशोरकडून जी काही "लॅंडमार्क' गाणी गाऊन घेतली आहेत, त्याला तोड नाही. किशोरच्या आवाजातील तरलता आणि त्याच्या आवाजातील गांभीर्य त्यांनी "पल पल दिल के पास' (ब्लॅकमेल), समा है सुहाना सुहाना (घर घर की कहानी), समझौता गमों से कर लो(समझौता), ओ साथी रे तेरे बीना भी क्या जीन (मुकद्दर का सिकंदर), जीवन से भरी तेरी आँखे, जिंदगी का सफर (सफर) अशा सुंदर, अप्रतिम गाण्यांमध्ये अल्लाद पकडली. व्यक्तिगत असफलता, असहायता आणि आयुष्यात काहीही साध्य करू न शकल्याची खंत...अशा भावना व्यक्त करणारे एक अतिशय सुंदर गीत गीतकार एम. जी. हश्मत यांनी लिहिले होते. नायिकेच्या मनातील भावना चित्रपटाच्या शीर्षकगीताच्या रूपात आणि त्याही एका गायकाच्या आवाजामध्ये! हेही या गीताचे एक वैशिष्ट्य होते. हश्मत यांच्या या सुंदर शब्दांना तशीच अप्रतिम चाल या जोडीने लावली आणि या गाण्यासाठी त्यांनी किशोरला पाचारण केले. ती सुंदर चाल ऐकून तोही खूष झाला. तो स्वत: एक जातिवंत अभिनेता असल्याने ते अर्थवाही शब्द त्याने जीव लावून गाइले आहेत. त्या गाण्याचे शब्द होते "मेरा जीवन कोरा कागज, कोराही रह गया'(कोरा कागज). रेकॉर्डिंग झाल्यावर किशोर बाहेर आला आणि दिग्दर्शक-संगीतकारद्वयीला म्हणाला, ""क्या ये ऐसेही कोरा ही रहेगा? इसके आगे कुछ नही होगा?'' किशोरच्या या वक्तव्यावर सगळे विचार करायला लागले आणि हा निराशेचा सूर कायम न ठेवता एका आशावादी प्रेरणादायी विचारावर या गाण्याचा शेवट करायचे ठरले; पण आता लिहायचे काय, हा प्रश्न आला आणि तेव्हा संगीतकार आनंदजींच्या मदतीला "सुभाषित रत्नभांडार' हे पुस्तक धावून आले. जीवनविषयक सुविचार आणि सुभाषिते असणाऱ्या या पुस्तकामधून काही ओळी घेऊन गाण्याचे तिसरे कडवे लिहिण्यात आले. ते असे होते- "दुख के अंदर सुख की ज्योती, दुख ही सुख का ग्यान, दर्द सह के जनम लेता, हर कोई इन्सान वो सुखी है, जो खुशी से, दर्द सह गया सुख का सागर, उसका जीवन, बन के रह गया...' "अंधारातच प्रकाशाचा मार्ग असतो' म्हणतात ना ते असे ! किशोरला सलाम ! -चंद्रशेखर महामुनी |
||
|
तुमची प्रतिक्रिया लिहा ... blog comments powered by Disqus |
||