रुपेरी वाळू आणि माडांच्या बनातले कोकण

गेले दोन आठवडे लागोपाठ ट्रेक झाले. आता थोडे तळकोकणात भटकून येऊ या. दोन दिवस थोडी पायाला भुरभुरती वाळू लावून गुदगुल्या करून घेऊ. या वेळी आपण जाऊ वेंगुर्ल्याजवळच्या रेडी आणि मोचेमाडच्या किनाऱ्यावर. कोकणातल्या टिपिकल मालवण-तार्कर्ली बीचपेक्षा थोडी वेगळी आणि गर्दीपासून दूर असलेली शांत-निवांत जागा म्हणजे हे दोन बीच.

वेंगुर्ल्यावरून निघून 7 किलोमीटरवर मोचेमाड खाडी पुलाच्या आधी उभा दांडा नावाची एक वाडी आहे. टेकडीच्या माथ्यावर त्या वाडीच्या बगलेतून उजवीकडे वळण घेऊन दाट जंगलातून रस्ता वळणावळणांनी सुरूच्या बनात येऊन थांबतो. दोन किलोमीटरवरचे हे मोचेमाड नावाचे लहानसे गाव आहे. गावात गाडी लावून अरुंद गल्लीमधून चालत, काही मच्छीमार बांधवांच्या घरांच्या अंगणातून वाट काढत आपण समुद्रकिनाऱ्यावर पोचतो. किनाऱ्यावर पोचण्याआधी काही ठिकाणी समुद्री झुडपे आहेत. त्यापुढे रुपेरी वाळू आपले स्वागत करते. खरा कोकण पाहावा तो इथेच. तळकोकणात. समोर रुपेरी वाळूच्या पायघड्या अंथरून समुद्र जणू काही आपलीच वाट पाहत असतो. अथांग सागर आणि त्यावर डोलणाऱ्या होड्या. त्यापुढे क्षितिजावर होणारी आकाशाशी भेट. मोचेमाडचा समुद्रकिनारा खरोखरीच एक अद्भुत जागा आहे. सभोवार असलेल्या उंच हिरव्यागार टेकड्यांमुळे द्रोणात असल्याचा भास होतो. या हिरव्यागार कुशीत पाठीशी सुरूचे बन आणि समोर असलेला रुपेरी वाळूचा स्वच्छ मैलभर लांबीचा सागरतीर, हा एक आगळा अनुभव असतो. उजवीकडे असलेली एक टेकडी सतत होणाऱ्या लाटांच्या पाठशिवणीच्या खेळाला दाद देत त्यांना अंगावर झेलत असते. सतत आदळणाऱ्या खाऱ्या लाटांमुळे येथील खडकावर एक सुंदर वेलबुट्टी उमटली आहे. इथे खडकावर जरा जपून चालावे लागते; नाहीतर खडकावर असलेल्या धारदार नक्षीमुळे पाय कापण्याचा धोका असतो. उथळ समुद्रामुळे समुद्रात भिजण्याचा आणि खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी हा एक सुरक्षित समुद्रकिनारा आहे.

तेथून मागे फिरून पुन्हा उभा दांडा वाडीत यायचे आणि उजवीकडे वळून शिरोड्याकडे जाणारा रस्ता धरायचा. या रस्त्याने सरळ गेले असता, आपण शिरोड्यामार्गे गोव्यात अरोंदा बीचवर पोचतो. महाराष्ट्र-गोवा सीमेच्या अगदी अलीकडे तीन किलोमीटरवर रेडीकडे जाणारा फाटा आहे. रेडीचा समुद्राकिनारा म्हणजे अगदी "हवाई' बेटांवर आल्याचा अनुभव. निळेशार पाणी, पांढरी स्वच्छ वाळू आणि थोडा गोवा संमिश्र महाराष्ट्राचा अनुभव. आसपास मच्छीमारांच्या लहान बोटी, गोव्यातून चुकून इकडे आलेल्या पर्यटकांच्या मोटरबोटी अशी अगदी थोडीशी गजबज असते. किनाऱ्यापासून जवळच रेडीचा किल्ला आहे. त्याचे इतिहासकालीन नाव "यशवंतगड'. समुद्रकिनारी असलेल्या एका टेकडीवर बांधलेला हा किल्ला नक्कीच समुद्रावर नजर ठेवण्याच्या दृष्टीने बांधला असावा. किल्ल्याची आज पडझड झाली असली तरी काही बुरुज, पहारेकऱ्यांच्या देवड्या आणि काही बांधकाम शाबूत आहे. या किल्ल्यात पाहण्यासारखे विशेष काही नसले तरी दाट झाडीत असलेल्या स्थानामुळे विविध प्रकारचे पक्षी आणि काही वेळा शिकारी समुद्रगरुड या परिसरात आढळून येतात. रेडीचे गणेशमंदिरही प्रसिद्ध आहे. रेडी गावातूनच गणेशमंदिराकडे डावीकडे जाणारा रस्ता आहे.

उपयुक्त माहिती :
रस्ते :
पुणे-सातारा-कोल्हापूर-कुडाळ-वेंगुर्ला-मोचेमाड-रेडी.
मुंबई-चिपळूण-कुडाळ-वेंगुर्ला-मोचेमाड-रेडी.
पुणे-कोल्हापूर-बेळगाव-गोवा-अरोंदा-रेडी-मोचेमाड
मुक्कामाची सोय : रेडी, शिरोडा, वेंगुर्ला, कुडाळ येथे बरीच निवासी हॉटेल आहेत.
आसपासचा परिसर :
वेंगुर्ला
किल्ले निवती
भोगवे बीच
शिरोडा
तेरेखोल

-पंकज झरेकर
http://www.pankajz.com/
http://www.flickr.com/photos/pankajz/
तुमची प्रतिक्रिया लिहा ...

blog comments powered by Disqus